Shetkari Karjmafi राज्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. एकीकडे कर्जाचे प्रचंड ओझे, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान, या दुहेरी संकटामुळे बळीराजाला जगणं अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार बच्चू कडू यांनी यासाठी सातत्याने आंदोलने करून आवाज उठवला.
याच संदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, “कर्जमाफीचा मुद्दा आमच्या जाहीरनाम्यात होता. सध्या आम्ही लाडकी बहीण योजना आणि वीजबिल माफी यावर काम करत आहोत. मात्र योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल.”
पत्रकारांनी “योग्य वेळ म्हणजे नेमकी कधी?” असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी थोडं हसत उत्तर दिलं, “योग्य वेळ आल्यावर आम्हीच तुम्हाला सांगू. राज्य चालवताना प्रत्येक गोष्टींचा समतोल साधून निर्णय घ्यावा लागतो.”
गणेशोत्सवाविषयी घोषणा
अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या. त्यांनी सांगितले की, यंदा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या काळात मुंबई मेट्रो सकाळी ६ पासून रात्री २ वाजेपर्यंत धावणार, तर गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मेट्रो पूर्ण दिवस सुरू राहणार आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्प
पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला असून, या प्रकल्पासाठी ज्यांची घरे व शेती भूसंपादनात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पावसाची स्थिती आणि पंचनामे
राज्यात पावसाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. अजित पवार यांचे विधान आश्वासक असले तरी ‘योग्य वेळ’ ही नेमकी कधी येणार याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
Disclaimer: ही माहिती विविध वृत्तसंकेतस्थळे, अधिकृत निवेदनं आणि पत्रकार परिषदेतून संकलित करण्यात आली आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत कागदपत्रांची खात्री करून घ्यावी.