Vehicles Toll Free महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर आहे. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या खासगी आणि शासकीय इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना टोल आकारला जाणार नाही. गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात आजपासून म्हणजेच शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे.
एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आलेले महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण आता प्रत्यक्ष राबवले जात असून या उपक्रमाअंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरही पुढील दोन दिवसांत टोलमाफी लागू होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कार्बन उत्सर्जन, प्रदूषणकारी वायू आणि हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टोलमाफीसाठी पात्र वाहनं कोणती?
या योजनेत खासगी हलकी इलेक्ट्रिक चारचाकी गाड्या, प्रवासी वाहने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि शहरी परिवहन उपक्रमांच्या बसेसना संपूर्ण टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र, मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
अटल सेतूवरील टोल नाके
सध्या अटल सेतूवरील शिवाजीनगर आणि गव्हाण टोल नाक्यांवर टोलमाफीची अंमलबजावणी झाली आहे. मुंबईसह राज्यभरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
मुंबईतील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या
मुंबईत हलक्या चारचाकी इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या सुमारे 18,400 इतकी आहे. याशिवाय हलकी प्रवासी वाहने 2,500, अवजड प्रवासी वाहने 1,200 आणि मध्यम प्रवासी वाहने सुमारे 300 आहेत. एकूण मिळून 22,400 इलेक्ट्रिक वाहने मुंबईत नोंदणीकृत आहेत.
दैनंदिन प्रवास करणारी वाहनं
अटल सेतूवर दररोज सुमारे 60 हजार वाहनांची वर्दळ असते. याशिवाय समृद्धी महामार्गावर 34 ते 40 हजार, तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जवळपास 22 हजार वाहनं प्रवास करतात. या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहता, टोलमाफीचा निर्णय वाहनधारकांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.
Disclaimer: या लेखातील माहिती उपलब्ध शासकीय घोषणांवर आणि विश्वासार्ह वृत्त स्त्रोतांवर आधारित आहे. धोरणामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. वाचकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासावी.